शेतकऱ्यांना पीक विमा मिळून देण्यासाठी शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; वंचित शेतकऱ्यांना लवकरच भरपाई

 





नांदेड : खरीप हंगाम २०२५-२६ मधील सोयाबीन पीक विमा भरपाईपासून वंचित राहिलेल्या माहूर, किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शिवसेनेचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख रविभाऊ राठोड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे.


रविभाऊ राठोड यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसह माजी केंद्रीय राज्यमंत्री हेमंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच शिव संवाद दौऱ्यादरम्यान हदगाव येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर हा विषय मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू केली.


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, माहूर तालुक्यातील पीक कापणी प्रयोगांमध्ये आढळलेल्या त्रुटींसाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई ही उत्पन्न आधारित पद्धतीने दिली जात असून, जिल्ह्यातील काही महसूल मंडळांतील शेतकऱ्यांची भरपाई तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित होती.


माहूर तालुक्यातील चार महसूल मंडळांतील पीक कापणी प्रयोगांवर विमा कंपनीने आक्षेप घेतल्याने हजारो शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडली होती. २९ मे २०२६ रोजी जिल्हास्तरीय सुनावणी समितीच्या बैठकीत या प्रकरणांची सविस्तर सुनावणी करण्यात आली असून, विमा कंपनीमार्फत भरपाई निश्चितीची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


दरम्यान, पीक कापणी प्रयोगांमध्ये हलगर्जीपणा किंवा चुका करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उर्वरित महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा भरपाई मिळावी यासाठी कृषी विभाग आणि विमा कंपनी समन्वयाने कार्यरत आहेत.


यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रविभाऊ राठोड यांनी सांगितले की, "शिवसेना पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हेच पक्षाचे धोरण असून, दिल्लीतील नेतृत्वापासून गल्लीतील कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक शिवसैनिक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढत राहील."


शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या सर्व वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचे त्यांनी आभार मानले. तसेच जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, बालाजी मुरकुटे, मनोज तिरमणवार, विशाल जाधव, मेरसिंग पवार, जयपाल जाधव, सागर रुणवाल आणि इतर शिवसैनिकांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post