घाटंजी | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी तालुक्यातील मुरली येथील सुपुनाथ मंगल कार्यालयात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' तसेच भव्य रक्तदान शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रा. आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. महसूल, आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांनी केलेल्या अर्ज, तक्रारी व विविध समस्यांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करून मार्गदर्शन केले.
याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक युवक-युवती व सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी (एसडीओ), आर्णी, घाटंजी व पांढरकवडा येथील तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, आयोजक, रक्तदाते, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिक यांचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी आभार मानले.
यावेळी "जनतेच्या दारी शासनाच्या योजना, प्रत्येक नागरिकाच्या समस्येचे त्वरित निराकरण आणि लोकहितासाठी अखंड जनसेवा हीच आमची बांधिलकी आहे," असा संदेश देण्यात आला.

