किनवट येथे ५ जून रोजी महागाई, शेतकरी, विद्यार्थी व बेरोजगारांच्या प्रश्नांवर भव्य मोर्चा

 


मराठवाडा संपादक| अनिल बंगाळे मो-70388 22361

किनवट, प्रतिनिधी : शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी किनवट येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाद्वारे शेतकरी कर्जमाफी, NEET पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी, वाढती महागाई, बेरोजगारी, प्रलंबित पीकविमा तसेच अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदे पेसा कायद्यानुसार स्थानिक युवक-युवतींमधून तात्काळ भरावीत, अशा विविध मागण्या शासनाकडे मांडण्यात येणार आहेत.


आयोजकांच्या माहितीनुसार, शेतकरी कर्जमाफीसह प्रलंबित पीकविमा मंजूर करणे, शेतकऱ्यांना डिझेल-पेट्रोलची उपलब्धता सुनिश्चित करणे, वाढती महागाई नियंत्रणात आणणे, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदांची भरती पेसा कायद्याच्या तरतुदींनुसार स्थानिक युवक-युवतींमधून करणे या प्रमुख मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.


याशिवाय आदिवासी समाजाला "वनवासी" संबोधण्याच्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवून आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याची मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.


मोर्चासाठी सकाळी ११ वाजता भगवान बिरसा मुंडा पुतळा, चुंगी नाका, किनवट येथे नागरिकांनी एकत्र यावे. त्यानंतर बिरसा मुंडा चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट असा मोर्चा काढण्यात येणार आहे.


या मोर्चास नांदेड उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलजी पावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


किनवट-माहूर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व शेतकरी, विद्यार्थी, युवक-युवती, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post