अमरावतीच्या प्रफुल्ल कुकडे यांना ‘लक्ष्यवेधी कार्यकर्ता पुरस्कार-२०२६’ जाहीर

 




अमरावती | जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 


अमरावती | सामाजिक परिवर्तन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कुकडे यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘लक्ष्यवेधी कार्यकर्ता पुरस्कार-२०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. यासोबतच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अमरावती शाखेलाही उत्कृष्ट शाखा म्हणून ‘लक्ष्यवेधी शाखा पुरस्कार-२०२६’ जाहीर करण्यात आला आहे.


विवेक जागर संस्था प्रकाशित तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मार्फत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक विचारांचा प्रसार, सामाजिक प्रबोधन आणि जनजागृती यासाठी प्रफुल्ल कुकडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.


पुरस्काराची घोषणा होताच सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधन क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून प्रफुल्ल कुकडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजामध्ये विवेकवाद, विज्ञाननिष्ठा आणि मानवतावादी मूल्ये रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.


या पुरस्कारांचे वितरण अहिल्यानगर येथे आयोजित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. यासाठी प्रफुल्ल कुकडे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.


या यशाबद्दल संघर्ष संस्था, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, गुरुदेव सेवा श्रम ट्रस्ट, संविधान जागर अभियान, विविध बचत गटांतील महिला, कामगार वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


यावेळी संघर्ष संस्थेच्या सचिव हर्षा सगणे यांनी सांगितले की, “समाजात विवेक, विज्ञाननिष्ठा आणि परिवर्तनाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवणाऱ्या कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

Post a Comment

Previous Post Next Post