प्रतिनिधी ,श्रीकांत राऊत यवतमाळ
महागांव :-दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका वृद्ध मजुराला कॉलर पकडून खाली पाडत थापडा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना महागाव शहरात घडली. या प्रकरणी अनिल संतोष पांडे (वय २५, रा. वॉर्ड क्र. ८, महागाव) याच्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तक्रारीनुसार, तक्रारदार हे ६२ वर्षीय मजूर असून ते महागावातील एका व्यक्तीकडे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ते एका घरासमोर फुले तोडत असताना आरोपी अनिल पांडे तेथे आला. त्याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने कॉलर पकडून खाली पाडले व शिवीगाळ करत थापडा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी अंकुशसिंह तेजबहादुरसिंह ठाकूर (वय ३६, रा. वॉर्ड क्र. ८, महागाव) हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपीने त्यांना धमकी देत हातातील लोखंडी टोकदार हुकने त्यांच्या तोंडावर वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात ठाकूर गंभीर जखमी झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर तक्रारदाराने महागाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अनिल संतोष पांडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून घटनेचा पुढील तपास महागांव पोलीस स्टेशनं चे हेड कॉन्स्टेबल गजानन येडतकर करत आहे
