विभागीय संपादक | निलेश रामगावकर
तळेगाव दशासर : पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, तळेगाव दशासर यांच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण कार्यक्षेत्रात पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणाची विशेष मोहीम सुरू आहे. पशुधनाला गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखता यावा, या उद्देशाने मोठ्या जनावरांचे नियमित लसीकरण करण्यात येत आहे.
दिनांक २० जुलै २०२६ पासून लम्पी स्किन डिसीज (LSD) प्रतिबंधक लसीकरण मोठ्या जनावरांना करण्यात येत आहे. त्यानंतर १३ ऑगस्ट २०२६ पासून तोंडखुरी-पायखुरी (FMD) रोग प्रतिबंधक लसीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गवई यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण सहकारी मधुकर तितरे, अथर्व रामगावकर, सुरज मानके आणि वैभव मेश्राम हे पशुपालकांच्या जनावरांचे लसीकरण करण्याचे कार्य सातत्याने करीत आहेत. कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन मोठ्या जनावरांना लसीकरण केले जात असून, पशुपालकांमध्येही जनावरांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
लम्पी स्किन डिसीज तसेच तोंडखुरी-पायखुरी यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पशुधन निरोगी राहिल्यास पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते. त्यामुळे तळेगाव दशासर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने सुरू असलेली ही लसीकरण मोहीम पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
