ईद-ए-मिलाद बंदोबस्तादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपी मनोज कदम याच्यावर गुन्हा दाखल
श्रीकांत राऊत महागांव यवतमाळ
महागांव :-ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महागाव पोलीस हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव तालुक्यातील धनोडा येथे केलेल्या कारवाईत चारचाकी वाहनातून तब्बल ३ हजार नग देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत दारूसह चारचाकी वाहन असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच अवैध गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत असताना महागाव पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धनोडा येथील जयस्वाल यांच्या दुकानासमोर सापळा रचण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा टियागो EV चारचाकी वाहन क्रमांक MH-29-CB-2623 मधून इसम मनोज परसराम कदम (वय ४०, रा. गणपती चौक, वॉर्ड क्र. १६, महागाव, ता. महागाव, जि. यवतमाळ) हा अवैधरित्या देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये १० पोती आढळून आली. प्रत्येक पोत्यात ३ पेट्या याप्रमाणे एकूण ३० पेट्या होत्या. प्रत्येक पेटीत ९० मिली क्षमतेच्या १०० बाटल्या असल्याने एकूण ३ हजार नग देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत १ लाख २० हजार रुपये, तर वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची किंमत ५ लाख रुपये, असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी आरोपी मनोज परसराम कदम याच्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे उप पोलीस निरीक्षक अमोल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
