देवगावात घरात आढळला विषारी नाग; सर्पमित्रांनी सुरक्षित केले रेस्क्यू

 



विभागीय संपादक निलेश रामगावकर 


धामणगाव रेल्वे/ देवगाव : जिल्हा परिषद शाळेजवळील एका घरात विषारी नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मोठ्या शिताफीने नागाला सुरक्षितरीत्या पकडून त्याचे रेस्क्यू केले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


मिळालेल्या माहितीनुसार, देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ एका घरात विषारी नाग आढळला. नाग दिसताच घरातील नागरिकांनी आरडाओरड न करता सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच MH-29 Helping Hand & Wild Adventure Club तसेच स्थानिक सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले.


सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षित पद्धतीने नागाला पकडले. सदर नागाची लांबी अंदाजे पाच फूट पाच इंच असल्याचे सांगण्यात आले. नागाला कोणतीही इजा न करता त्याचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या आवश्यक मार्गदर्शनानुसार त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


नाग विषारी असल्याने त्याला पकडताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून साप पकडण्याचा किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. घराच्या परिसरात किंवा शेतात साप आढळल्यास तातडीने प्रशिक्षित सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


दरम्यान, सर्पमित्रांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका बाजूला नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटला, तर दुसऱ्या बाजूला नागाचा जीवही वाचला. ‘साप दिसला तर मारू नका, सर्पमित्रांना बोलवा’ हा वन्यजीव संरक्षणाचा संदेश या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाला.


या रेस्क्यू मोहिमेत MH-29 Helping Hand & Wild Adventure Club चे अध्यक्ष अक्षय रूपवने ,अनिकेत राऊत, गौरव रूपवने, प्रशांत बनकर, सुधीर मोरे,फारुख शेख, मंगेश मलवार, धीरज वाघमारे,प्रशांत इंगोले इत्यादी सर्पमित्रांनी सहभाग घेतला. सर्पमित्रांच्या धाडसाचे व तत्परतेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post