यवतमाळ विधान परिषद निवडणूक 2026 | 18 जूनला मतदान | ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर

 

गावाकडची बातमी

यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणूक २०२६ : मतदान १८ जूनला; ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही जाहीर

महाराष्ट्र


यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी| सुनिल धुर्वे 

यवतमाळ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या निवडणुकीसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांनी संबंधित तहसीलदारांना मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत निर्देश दिले आहेत.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार १ जून २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून, छाननी ९ जून, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ११ जून २०२६ आहे. मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून २०२६ रोजी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, अनुसूचित ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभेची सूचना ८ जून २०२६ पर्यंत देण्यात येणार असून, १२ जून २०२६ रोजी तहसीलदारांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप मसुदा जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर १७ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यावरील हरकती व सूचना १९ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून ३ जुलै २०२६ पर्यंत अभिप्राय दिला जाईल. अंतिम आरक्षण अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता ८ जुलै २०२६ पर्यंत मिळणार असून, अंतिम प्रभाग रचना १० जुलै २०२६ रोजी व्यापक प्रसिद्धीस देण्यात येणार आहे.

निवडणूक व आरक्षण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित महसूल व प्रशासन यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post