‘ते पन्नास दिवस’ कादंबरीच्या न्यायालयीन संघर्षातील कार्यकर्त्यांचा गौरव.
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
बडनेरा– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अनिस) बडनेरा शहर शाखेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह, बुद्ध विहार, अशोक नगर, यवतमाळ रोड, नवी वस्ती, बडनेरा येथे संवाद व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणारी ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महा. अनिसच्या वैज्ञानिक जाणीव विभागाचे जिल्हा कार्यवाह प्रा. नरेंद्र धर्माळे होते. प्रमुख अतिथी म्हणून एआयएसएफच्या राज्य सचिव कॉ. प्रतीक्षा ढोके तसेच एआयवायएफचे राज्य सचिव कॉ. सागर दुर्योधन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बडनेरा शहर शाखेचे कार्याध्यक्ष दिलीप लाडे यांनी शाखेच्या मागील एक वर्षातील कार्याचा सविस्तर अहवाल सादर केला. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, संविधान जागर अभियान, सामाजिक प्रबोधन, रक्तदान उपक्रम तसेच विविध जनजागृती मोहिमांमधील कार्याचा आढावा त्यांनी मांडला. आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजन आणि संघटन विस्तारावरही चर्चा करण्यात आली.
यावेळी महा. अनिस अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल मंदा श्रीधर यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत समाजात विवेकवादी विचार रुजविणे, अंधश्रद्धेविरोधात व्यापक जनजागृती करणे आणि संविधानिक मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीत उपस्थित कार्यकर्ते व सदस्यांनीही आपली मनोगते व्यक्त करत बडनेरा शाखेच्या कार्याचे कौतुक केले. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात अधिक सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी युवक, विद्यार्थी आणि लोकशाही हक्कांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणाऱ्या कॉ. प्रतीक्षा ढोके आणि कॉ. सागर दुर्योधन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लेखक पवन भगत यांच्या ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीसंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ विद्यापीठ स्तरापासून न्यायालयीन पातळीपर्यंत उभारलेल्या संघर्षातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थी हक्क, शैक्षणिक प्रश्न आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
याचबरोबर सामाजिक कार्य, संविधान जागर अभियान आणि जनप्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पल्लवी ढोले, सुषमा डोंगरे आणि गजेंद्र लोणारे यांचाही सत्कार करण्यात आला.
या बैठकीस महा. अनिसचे जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे, अमरावती शहर कार्याध्यक्ष सचिन खोब्रागडे, बडनेरा शहर शाखा अध्यक्ष रेहमान शहा, प्रधान सचिव भूमिका पहूरकर, संविधान जागर अभियानाच्या कार्यवाह विजया घोडेस्वार, बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाचे कार्यवाह महादेव मेश्राम तसेच अनिल शेंडे, मीनाक्षी पालेकर, पुष्पा बनसोड, पल्लवी ढोले, सविता बनसोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप लाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजया घोडेस्वार यांनी केले.
वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि संविधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या महा. अनिसच्या या संवाद बैठकीतून आगामी सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांची दिशा निश्चित करण्यात आली.

