अमरावती जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळा चिरोळी येथील मुख्याध्यापक श्री जवाहर गाढवे यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून त्यांच्या निलंबनासह बडतर्फीची मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात काही सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारीनुसार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी अंदाज समितीच्या भेटीदरम्यान समितीची दिशाभूल करून आश्रम शाळेतील कथित भ्रष्टाचार व प्रशासकीय अनियमितता लपविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणीही प्रशासनाकडे केली आहे. मागील बदली प्रक्रियेसह पुरवठा कामांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणात काही व्यक्तींनी आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारदारांनी शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक पातळीवर अन्याय झाल्याचा दावा करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, संबंधित आरोपांबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, चौकशीअंतीच सत्य समोर येणार असल्याचे बोलले जात आहे. तक्रारदारांनी योग्य कारवाई न झाल्यास राज्यपाल, राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागण्याचा तसेच आंदोलनाचा इशाराही प्रेम थोमस यांनी दिला आहे.
