गावाकडची बातमी प्रतिनिधी | माहूर-किनवट | पंकज जयस्वाल | नांदेड | मो. 9421367593
संपूर्ण देशात एक नंबरचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या Bharatiya Janata Party चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी महाराष्ट्रभर पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष पथके नियुक्त केली आहेत. त्या अनुषंगाने किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात प्रथमच हे पथक दाखल झाले असून, त्यात मधुसूदन जाधव, दिग्विजय कांबळे, अजिंक्य जाधव आणि ऋत्विक जोगी यांचा समावेश आहे.
पडत्या काळात अनेक अन्याय सहन करत पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी जिवाची बाजी लावून भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे गावागावांत पोहोचवली. केंद्र व राज्यात सत्ता स्थापनेसाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र सत्ता आल्यानंतर विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर पक्षात घुसखोरी झाल्याने जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
राष्ट्रीय काँग्रेस, Nationalist Congress Party तसेच Shiv Sena (UBT) यांसारख्या पक्षांमधून आलेल्या नेत्यांचा सन्मान व्हावा, याबाबत कुणाचे दुमत नसले तरी “पाहुण्यांचा सन्मान करताना घरच्यांचा अपमान होऊ नये,” अशी भावना जुन्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे पक्षनिष्ठांमध्ये नैराश्य पसरल्याचे चित्र होते.
हीच बाब ओळखून प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी नियुक्त केलेल्या पथकामार्फत पक्षनिष्ठांच्या व्यथा आणि पक्षाची सद्यस्थिती जाणून घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याचे दिसून येत आहे.
सदर पथक किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील गावोगावी जाऊन बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहे. विविध राजकीय व संघटनात्मक विषयांवर चर्चा करून कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले जात आहे. मतदारसंघातील सुमारे ४०० ते ५०० बूथस्तरीय कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे नियोजन असल्याची माहिती पथक प्रमुख मधुसूदन जाधव यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना निश्चितच मोठे पाठबळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
