कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करा

 




Shiv Sena सह पिक विमा पासून वंचित राहिलेल्या माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांची थेट मुख्यमंत्र्याकडे मागणी


गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो. 9421367593


माहूर तालुक्यातील सन 2025-2026 खरीप हंगामातील सोयाबीन पिक विमा नुकसान भरपाई संदर्भातील निकषाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील माहूर तालुक्यातील चारही मंडळांसह जिल्ह्यातील एकूण 21 पीक कापणी प्रयोगात कृषी कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या गंभीर चुकांमुळे शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह Shiv Sena च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट Devendra Fadnavis यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून यामुळे खळबळ उडाली आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन 2025-2026 या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण 21 मंडळांसह पेसा क्षेत्रातील माहूर तालुक्यातील चारही मंडळांमध्ये सोयाबीन पिकासाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोग प्रक्रियेमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व चुका करण्यात आल्या आहेत.


सदर प्रक्रियेदरम्यान शासनाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आले असून, प्रत्यक्ष शेतस्थितीचे अचूक प्रतिबिंब न दर्शविता चुकीचे व भ्रामक अहवाल सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, अनेक ठिकाणी प्रत्यक्ष प्रयोग न करता केवळ कागदोपत्री नोंदी पूर्ण करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.


वरील गंभीर त्रुटींमुळे शासनाच्या पिक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरणारे अनेक शेतकरी अन्यायकारक पद्धतीने नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. ही बाब केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाची नसून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी व संभाव्य दंडनीय स्वरूपाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


त्यामुळे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता व इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच पीडित व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी टाळण्यासाठी कठोर नियंत्रण व पारदर्शक यंत्रणा लागू करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


सदर बाब अत्यंत गांभीर्याची असून शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


या निवेदनावर विवेक देशमुख (जिल्हाध्यक्ष नांदेड), रवि उत्तमराव राठोड (सह संपर्कप्रमुख नांदेड जिल्हा), मनोज त्रिमनवार (जिल्हा सचिव नांदेड), सुदर्शन जोगराम नाईक (तालुका प्रमुख माहूर), बालाजी मुरकुटे (ता. प्रमुख किनवट), विशाल जाधव, सागर अशोक रुणवाल, महेश रामेश्वर तुमशेटवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post