भरविर खुर्द येथे महाबली हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व कायापालट गावकरी

 




 नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव 


इगतपुरी आज रोजी भरविर खुर्दच्या इतिहासातील सुवर्ण दिन.भरविरकरांच्या ह्रदयात पिढ्यान् पिढ्या अढळस्थान मिळविणारा हा दिवस.

 समस्त भरविर खुर्द ग्रामस्थ ज्याच्या पुढे भक्तीभावाने नतमस्तक होतात ते ग्रामदैवत म्हणजे बालभैरवनाथ महाराज.

      जुन्या कौलारु चौमौळी मंदिराच्या जागेवर सिमेंट काॅंक्रीटचे दिमाखदार मंदिर उभे राहिले आहे.गावशिवारातील कोणत्याही ठिकाणाहून कळस दिसेल इतकं उंच आणि सुंदर मंदिर तयार झालं आहे.अगदी शेजारच्या गावातून दिसावं असं सुंदर मंदिर आहे हे.

   गेली सात वर्षे या मंदिराचे बांधकाम चालू होते.आपल्या गावासोबतच पंचक्रोशीतील भाविकभक्त आणि अकोले तालुक्यातील धामणगाव पाट व इदेवाडी यांसारख्या अनेक गांवातून बालभैरवनाथावर नितांत श्रद्धा असणार्‍या भाविक भक्तांनी सढळ हातांनी या नूतन मंदिर बांधकामासाठी देणग्या दिल्या.बालभैरवनाथांचा रथ व झोळी आमच्या गावात येऊ द्या अशी विनंती या बाहेरगावच्या ग्रामस्थांनी केली असता बालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थ यांनी या गावांमध्ये बालभैरवनाथांचा मुखवटा रथाद्वारे फिरविला व देणगीची झोळीही फिरविली मंदिरासाठी भरुभरुन दान मिळाले.

     आॅक्टोबर २०२५ मध्ये म्हणजेच दिवाळीच्या दरम्यान कलशारोहण कार्यक्रम संदर्भात ग्रामस्थांची मिटिंग झाली व सर्वानुमते दि.२२ फेब्रुवारी हा शुभ दिवस कलशारोहण कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आला. यासाठी दि.१६ फेब्रुवारी २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.या सप्ताह दरम्यान महदभाग्याने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती १९ फेब्रुवारी दरम्यान होती.बालभैरवनाथ महाराजांच्या नूतन मंदिराच्या कलशारोहणासंदर्भात छत्रपती शिवरायांबद्दलच्या काही ओळी प्रकर्षाने मनाला स्पर्शून गेल्या.

*राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस.*

      या सप्ताह कालावधीतील आठही दिवशी दानशूर व्यक्तींनी अन्नदानाच्या पंगतीत अन्नदान करण्यासाठी पुढाकार घेतला.महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार,गायक व पखवाज वादक यांना किर्तनरुपी सेवेसाठी आमंत्रित करण्यात आले.हजारो भाविक मंडपात बसतील अशा मंडपाची व्यवस्था व महाराष्ट्रभर मोठमोठ्या कार्यक्रमात ज्यांची साऊंड सिस्टीम असते अशी नामांकित साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली.गावातील व बाहेरगावातील ज्यांना हा आठ दिवसाचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवता येणार नव्हता अशा सर्वांसाठी बालाजी टि.व्ही.चॅनेलतर्फे लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली.ही सर्व किर्तने व कार्यक्रम लाईव्ह सोबतच रेकाॅर्डेडही असल्याने भविष्यात कधीही तो आपण पाहू शकतो.

     हा भव्यदिव्य सोहळा तेवढाच दिमाखदार व्हावा म्हणून नदीच्या बाजूकडील दगडांवर मुरुम टाकून भव्य असे मैदान बनविण्यात आले.या मैदानावर भाविक भक्तांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.सुग्रास जेवण बनविणारे आचारी यांनीही आठ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन हा अन्नयज्ञ चालू ठेवला .भाविकभक्तांना तृप्त केले.यासाठी वाढण्याचं काम दररोज करणार्‍या युवकांचं विशेष कौतुक करावं लागेल.एकाच वेळेला हजारोंच्या संख्येने जेवणासाठी बसणार्‍यांना वाढपे पुरतील की नाही याची शंका वाटत असतांना त्यांनी ही जबाबदारी लिलया पेलली.अनवाणी पायांनी लगबगीने वाढत असतांना त्यांच्या तळपायांची कातडी सोलली गेली तरीही त्याची तमा न बाळगता इथून कुणी उपाशी व अर्धपोटी जाऊ नये याची दक्षता ते घेत होते.एखाद्या मॅनेजमेंट गुरुलाही लाजविल अशी ही व्यवस्था इथे सुरळितरित्या चालू होती.सकाळी बघावं तर मैदानदेखील स्वच्छ झालेलंअसायचं.या कालावधीत जो तो बालभैरवनाथांचा सेवेकरी झाला होता.मिळेल ते काम करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता.आणि प्रत्येक दिवसातला प्रत्येकक्षण डोळ्यांत साठवित होता.या कलशारोहण कार्यक्रमाच्या ऐतिहासिक क्षणांचा भागीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर ठळकपणे दिसत होता.सासुरवाशीणींना त्यांच्या बालमैत्रीणी बर्‍याचदिवसांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटल्याने समाधान वाटत होते.

      शेवटी २३ फेब्रुवारीचा दिवस उजाडला.हा दिवस म्हणजे या कलशारोहण कार्यक्रमाचा सांगता दिवस.काल्याचे किर्तन संपल्यानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचं सेवन करुन पाहुणेमंडळी सासुरवाशीणी लेकी,गावातीलच परंतु बाहेरगांवी कामाधंद्यानिमित्त राहत असलेले असे सर्वजण एकमेकांचा निरोप घ्यायला लागले.गेल्या सात दिवसांचा उत्साह तो आनंद आता डोळ्यांच्या कडा ओल्या करत होता.गहिवर दाटून येत होते.खरोखरच दिवाळी दसर्‍यापेक्षाही या कलशारोहण कार्यक्रमाने सर्व ग्रामस्थांना व येथील माहेरवाशीणींना इथे एकत्र आणण्याचं काम केलं होतं.प्रत्येकाची उपस्थीती घरातला कार्यक्रम असल्यासारखी होती.मंडप हळूहळू रिकामा होत होता.

   शेवटी महाराष्ट्रातले नामवंत कवी *फ.मु,शिंदे* यांच्या कवितेच्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या.

  *जत्रा पांगते पाल उठतात.*

  *पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात.*

     शेवटी आपल्या भरविरकरांचे व भरविर बाहेरील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या बालभैरवनाथांच्या नूतन मंदिरासाठी शासकिय निधी उपलब्ध करुन देणारे सन्माननिय राजकिय क्षेत्रातिल खासदार,आमदार,जि.प.सदस्य,पंचायत समिती सदस्य,इतर सर्वच क्षेत्रातिल मान्यवर,सर्वच ग्रामस्थ,बाहेरगावचे देणगीदार भाविकभक्त यांचे एक भरविरकर म्हणून बालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार.तसेच बालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या तरुण तडफदार विश्वस्त मंडळीने गेली सात आठ वर्षे आपला अमूल्य वेळ देऊन अथक मेहनत या कामी घेतली आहे.त्यांचेही भरविरखुर्द ग्रामस्थांच्या वतीने खूप आभार.

      या ठिकाणी संत तुकाराम महारांच्या अभंगाच्या ओळी उद्ध्ृत करणे उचित ठरेल.

*याजसाठी केला होता अट्टाहास*

   *शेवटचा दिस गोड व्हावा.*

Post a Comment

Previous Post Next Post