२२ फेब्रुवारीला शेलू वेताळ येथे शासकीय सेवा व योजनांचा भव्य महामेळावा
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसह जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
मूर्तिजापूर — शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याची बाब लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शासकीय सेवा व योजनांचा भव्य महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शेलू वेताळ येथील श्री वेताळ बाबा मंदिर परिसरात हा महामेळावा पार पडणार आहे.
हा उपक्रम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मूर्तिजापूर तालुका विधी सेवा समिती व सर्व शासकीय विभाग तसेच अकोला जिल्हा वकील संघ व मूर्तिजापूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
महामेळाव्यास मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ) येथील प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके (पालक न्यायमूर्ती), मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना,पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम,अॅड मोतीसिंह मोहता व अॅड अजय वाघमारे असणार आहेत.
महामेळाव्यात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सेवा, कायदेशीर मदत, विविध दाखले, तक्रार निवारण तसेच नागरिकांना थेट लाभ मिळावा यासाठी विविध शासकीय विभागांचे 40 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यासंदर्भातील माहिती मूर्तिजापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आसिफ तांबोळी व न्यायाधीश आर. आर. पकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मूर्तिजापुर वकील संघाचे अध्यक्ष अॅड सुनिल कांबे, उपाध्यक्ष अॅड निलेश सुसतकर, सचिव अॅड शरद मेहरे, कोषाध्यक्ष अॅड सिमरन देविकर यांच्यासह न्यायालयातील विधीज्ञ,महिला विधीज्ञ व कर्मचारी उपस्थीत होते. आभार व सुत्रसंचालन अॅड श्रीकृष्ण तायडे यांनी केले.





