जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती धामणगाव रेल्वे: दि. 21 जून : सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, एनसीसी तसेच स्काऊट-गाईडचे कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमात विद्यालयाचे शारीरिक शिक्षक सौरभ पांडे व शोभेराम जावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने योगाभ्यास करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद केले. नियमित योग व प्राणायामामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य सुदृढ राहते, तसेच तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.यावेळी उपप्राचार्य प्रमोद हातेकर व पर्यवेक्षक नरेश कावलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षकवृंद, एनसीसी व स्काऊट-गाईड विभागाने विशेष परिश्रम घेतले. योगाच्या माध्यमातून निरोगी भारताचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
