वाशिममध्ये बसपाची जिल्हा संघटन समीक्षा बैठक संपन्न; "गाव तिथे शाखा" अभियान राबविण्याचे आवाहन
Gavakadachi batmi network
विशेष प्रतिनिधी सुनिल धुर्वे
वाशिम, प्रतिनिधी : बहुजन समाज पार्टीच्या वाशिम जिल्हा संघटन समीक्षा बैठकीचे आयोजन उत्साहात पार पडले. या बैठकीला बसपाचे प्रदेश सचिव इंजि. दादाराव उईके प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी बसपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक डी. जी. जमदाडे, जिल्हा प्रभारी ॲड. संघनायक मोरे, जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल गवई, उपाध्यक्ष रुपेश वानखडे, जिल्हा कोषाध्यक्ष भारत सावळे यांच्यासह वाशिम व रिसोड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत विविध विधानसभा क्षेत्रांतील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना इंजि. दादाराव उईके म्हणाले की, "सामाजिक व्यवस्था परिवर्तनाची भूक लागल्याशिवाय कार्यकर्ता पेटून उठत नाही. गाव तिथे शाखा निर्माण करण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने केला पाहिजे. पक्षाच्या वरिष्ठांकडून आवश्यक ते सर्व सहकार्य व ताकद पुरविण्याची तयारी आहे. बहुजन समाजातील वंचित घटकांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी बसपा कार्यकर्त्यांच्या त्याग व निष्ठेच्या बळावर काम करत आहे."
ज्येष्ठ नेते डी. जी. जमदाडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, "पक्षाने मला काय दिले यापेक्षा मी पक्षाला काय देऊ शकतो, या भावनेतून काम केले तर बहुजन समाज पार्टी देशातील सत्ताधारी पक्ष बनू शकते. विधानसभा स्तरावर संघटन बांधणीचे नियोजन करून गावागावांत शाखा स्थापन कराव्यात आणि मजबूत कार्यकर्त्यांची फळी उभी करावी."
जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल गवई यांनी आपल्या समीक्षेत सांगितले की, वाशिम जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मातील कार्यकर्त्यांना एकत्र करून बसपाची मजबूत संघटना उभारण्यात येणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बसपाचा निळा झेंडा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जिल्हा प्रभारी ॲड. संघनायक मोरे यांनी कार्यकर्त्यांना तत्काळ कामाला लागण्याचे आवाहन करत, प्रत्येकाने आपल्या गावापासून शाखा स्थापन करण्यास सुरुवात करावी आणि येत्या एका महिन्यात आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये किमान पाच शाखा उभारून दाखवाव्यात, असे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान काही महत्त्वाच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. आझाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी रूपेश भगत यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला असून त्यांना बसपाचे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच विनोदभाऊ आंभोरे यांची रिसोड विधानसभा अध्यक्ष, उमेश जाधव यांची वाशिम विधानसभा अध्यक्ष, रवी इंगोले यांची वाशिम तालुका अध्यक्ष आणि ॲड. संतोष पडघान यांची जिल्हा विधी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनियुक्त रिसोड विधानसभा अध्यक्ष विनोदभाऊ आंभोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल मैंदकर (तालुका अध्यक्ष) यांनी केले. यावेळी शुभम ताजने, अनिल भगत, वैभव काशिंदे यांच्यासह बसपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
