भव्य सादरीकरणातून उपस्थितांना शिवकाळाची अनुभूती
अकोला, दि. १८: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंग, त्यांचे अतुलनीय शौर्य आणि उदात्त मूल्यांचा वारसा सांगणाऱ्या भव्य नाट्य सादरीकरणाने आज अकोलेकर मंत्रमुग्ध झाले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनातर्फे दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहेत. त्यात आज शिवचरित्रावर आधारित भव्य नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तहसीलदार कुणाल झाल्टे, राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या लेखा अधिकारी स्मिता तिमसे–कानडजे, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय प्राचार्य डॉ.जगदीश साबू,शाळा समितीचे मदन खंडेलवाल, श्री.साधू आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रयोगातून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम, उदात्त मूल्ये, स्वराज्य स्थापनेचा प्रवास अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला. भव्य नेपथ्य, कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे उपस्थितांना प्रत्यक्ष शिवकाळाचा अनुभव घेता आला.
पोवाडे, लोककला आणि ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यात आले.
उद्या सायं. ५ वा. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.


