जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती,धामणगाव रेल्वे : तालुक्यात मंजूर असलेल्या २७५ पांदण रस्त्यांची कामे गेल्या तीन वर्षांपासून सुरू न झाल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सुरज गंथडे यांनी शेतकऱ्यांसह २ जून रोजी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनानंतर तहसीलदार अभय घोरपडे व सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना सात दिवसांच्या आत कामे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा करारनामे रद्द करून भविष्यात तालुक्यातील कोणतीही कामे देण्यात येणार नाहीत, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठी कारवाई करत तब्बल १२४ पांदण रस्त्यांचे करारनामे रद्द केले आहेत. याबाबत उपअभियंता बकाले यांनी आदेश जारी केला असून, श्रीनिवास कन्स्ट्रक्शन (औरंगाबाद) यांच्याकडील १०७, एस. ए. बिल्डर्स (परतवाडा) यांच्याकडील १० आणि श्रीकांत राजेंद्र काळे (परतवाडा) यांच्याकडील ७ पांदण रस्त्यांच्या कामांचे करार रद्द करण्यात आले आहेत.
प्रहारच्या आंदोलनामुळे संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली असली तरी शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पडल्याची भावना व्यक्त होत आहे. निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या गाजावाजात पांदण रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले, परंतु तीन वर्षांनंतरही प्रत्यक्षात कामे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे केवळ आश्वासने देऊन मतांसाठी शेतकऱ्यांचा वापर केला जातो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रिया :
"आमदार प्रताप अडसड यांनी मोठ्या गाजावाजात पांदण रस्त्यांचे उद्घाटन करून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. महसूलमंत्री, मुख्यमंत्री तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी असतानाही शेतकऱ्यांना पांदण रस्त्यांसाठी एवढा त्रास का सहन करावा लागत आहे?" असा सवाल प्रहारचे तालुकाप्रमुख सुरज गंथडे यांनी उपस्थित केला.
#धामणगावरेल्वे, #पांदणरस्ते
#शेतकरीप्रश्न,#प्रहारजनशक्तीपक्ष, #सुरजगंथडे
#प्रतापअडसड,#सार्वजनिकबांधकामविभाग,#करारनामेरद्द,#ग्रामीणविकास,#शेतकरीआंदोलन,#महाराष्ट्रबातम्या,#अमरावतीजिल्हा,#तहसीलकार्यालय,#ठिय्याआंदोलन,#PandanRoads,#DhamangaonRailway,#FarmerIssues,#PraharJanShaktiParty,#MaharashtraNews, #PublicWorksDepartment
