किनवट येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची नवी इमारत उद्घाटनासाठी सज्ज

 






किनवट  : किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या जुन्या इमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. जागेअभावी कार्यालयीन कामकाज सुरळीत पार पाडणे कठीण होत होते. अनेक वर्षांपासून या इमारतीचा विस्तार किंवा नवीन इमारत उभारण्याची मागणी केली जात होती. किनवट विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर ही मागणी पूर्ण झाली असून, कोठारी येथे राष्ट्रीय महामार्गालगत 520.69 लाख रुपये खर्चून केवळ 18 महिन्यांत गुत्तेदार अमित उत्तरवार (यवतमाळ) यांनी पूर्ण केले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम आदिवासी उपविभाग किनवट चे उपविभागीय अभियंता कलीम खान यांनी दिली. अत्यंत कमी वेळात काम पूर्ण केल्याने सदर इमारत उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. या नव्या इमारतीमुळे आदिवासी विभागाचे प्रशासन अधिक कार्यक्षम आणि सुसज्ज होणार आहे.

नवीन इमारतीमुळे आदिवासी विकासाला गती मिळणार असून पूर्वी या कार्यालयातून नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांचा कारभार पाहिला जात होता. मात्र, हिंगोली आणि परभणी येथे स्वतंत्र प्रकल्प अधिकारी कार्यालये स्थापन झाल्याने आता या कार्यालयामार्फत केवळ नांदेड जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचे कामकाज पार पडणार आहे.

हे कार्यालय आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. आदिवासी आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे नियमन, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल समजल्या जात असून आदिवासी युवक, शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजना आणि वैयक्तिक लाभाच्या योजना या कार्यालयाच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्यामुळे नवी इमारत हे केवळ एक बांधकाम नसून, आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी उभारलेले मजबूत पाऊल आहे.

या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून अधिक प्रभावी योजनांची अंमलबजावणी करता येणार असून, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post