किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे दुःख द निधन; गुरुवारी होणार अंत्यसंस्कार..
किनवट, अनिल बंगाळे - किनवट विधानसभा मतदार संघातील ओबीसी नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी नववर्षाच्या (१ जानेवारी २०२५) पहाटे ५ वाजताचे दरम्यान हैदराबाद येथिल किम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. २ जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील दहेलीतांडा या मुळ गावी ११ वाजताचे दरम्यान अंत्यसंस्कारविधी पार पडणार असल्याचे वृत्त आहे. मा.आ.नाईकांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंड असा परिवार असल्याचे समजते. "मरावे परी किर्तीरुपी उरावे" या उक्तीला वास्तवात उतरवण्याचे काम नाईकांनी त्यांच्या कार्यकाळात दाखऊन दिल्याने आज तमाम मतदारसंघ दु:खभर्या वातावरणात स्तब्ध दिसून योतोय.
मा.आ.प्रदीप नाईकांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर १९९९ ची पहिली विधानसभा निवडणूक लढवली परंतू त्यात ते पराभूत झाले. तसा त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. पराभवानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना वार्यावर सोडले नाही तर त्यांच्याकडे वसंतराव नाईक विकास महामंडळावर त्यांना घेतले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भरभरुन मताधिक्यांनी विजयी झाले ते २००९ आणि २०१४ अशी विजयाची हॅट्रीक पूर्ण केली. मात्र २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत सलग पराभव झाला. तरीसुद्धा नाईकांनी २०२५ मध्ये होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्याची तयारी चालू असतांना अचानकच त्यांचे जाणे त्यांच्या चाहत्यांना वेदनादायी ठरले असून नाईक पर्वाचा अस्त झालाय अशा अनेकांच्या भावना बोलक्या झाल्या आहेत.
नाईकांची जिल्ह्याच्या राजकारणावर अगदी मजबूत पक्कड होती. माजी केंद्रीयमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जेष्ठ नेते शंकरआण्णा धोंडगे अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेवर दिनकर दहिफळे, प्रकाश राठोड, समाधान जाधव यांच्यासह अनेकांना महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळवून देऊन नाईकांनी आपला ठस्सा उमटवला होता. माहूर नगर पंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट नगर परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक अशा विविध संस्थांवर त्यांची पक्कड होती. त्यातून त्यांनी अल्पसंख्यांकांना, ओबीसींतील उमद्या नेतृत्वांना संध्या उपलब्ध करुन दिल्या असे प्रसंग अविस्मरणीयच ठरणार आहेत.