गरीब विधवा आदिवासी भगिनीचा आसरा हडपण्याचा डाव !!

 


करंजगाव येथील जि.प.शिक्षक हपापलेला!!

महिलेच्या सासऱ्याला केले आहे हिप्टोनाईज !



अचलपूर, शिरगाव (क): एका विधवा आदिवासी महिलेसह तिच्या दोन मुलींना बेघर करण्याचा डाव एका शिक्षकासह त्यांच्या वडिलाने रचला आहे. या प्रकारामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या महिलेने न्यायासाठी वरिष्ठांकडे आर्जव केले आहे.

अनिता गजानन कासदे नामक महिला शिरजगाव क. पोस्टे अंतर्गत रामनगर करजगाव येथे वास्तव्यास असून मागील वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना कु. लक्ष्मी (२०) व निशा (१६) या दोन मुली आहेत. ५०० स्क्वे. फूट जागेत त्यांची वारसा हक्काची झोपडी आहे. मोलमजुरी करून त्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. त्यातच अनिता यांचे सासरे वयोवृद्ध आहेत आणि त्यांना मद्याचे व्यसन आहे. पतीनिधनाने दोन मुलींसह वृद्ध सासऱ्याचे संगोपन करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनिता यांच्यापुढे आता स्वतःचे घर वाचविण्यासाठी नवा संघर्ष सुरू झाला आहे. हक्काच्या घरातून आम्ही तसूभरही हलणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा अनिता यांनी घेतली आहे.

रामा नामक अनिता यांचे सासरे वयोवृद्ध आहेत. त्यांना मद्याचे व्यसन असल्याचे अनिता यांचे म्हणणे आहे. अनिता ज्या झोपडीवजा घरात राहतात, ते झोपडीवजा घर रामा यांच्या नावे आहे. रामायांच्या व्यसनाधीनतेचा आणि वृद्धापकाळाने आलेल्या मानसिक अस्वस्थतेचा फायदा स्थानिक एका जि. प. शिक्षकासह त्यांच्या वडिलाने घेतला आहे. सदर शिक्षकाचे वडील चपराशी पदावर कार्यरत आहेत.

एका एजंटला हाताशी घेऊन सदर दोघांनीही विधवा असाहाय्य महिलेचे झोपडीवजा घर गिळंकृत करण्याचा डाव रचला आहे. वृद्ध सासऱ्याला दारू पाजणे, सदरची झोपडी विकण्यासाठी प्रलोभन दाखवणे, दबाव टाकणे, दुचाकीवर बसवून घरातून घेऊन जाणे असे विविध फंडे सदर जि. प. शिक्षक आणि त्यांच्या वडिलाकडून सातत्याने वापरले जात आहे.सदर झोपडी  घर ज्या ठिकाणी उभे आहे, ती जागा रामनगरात मोक्याच्या ठिकाणी आहे.


त्यामुळे असाहाय्य असलेल्या महिलेला दरडावून धमकावून चूप करायचे आणि महिलेच्या वृद्ध सासऱ्याकडून जागा नावे करून घ्यायची, यासाठी जि. प. शिक्षक आणि त्यांच्या वडिलांचा सुरू असलेला खटाटोप उधळून लावावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, यासाठी अनिता गजानन कासदे यांनी शिरजगाव पोलिसस्टेशन, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत करजगाव आणि दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांना साकडे घातले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post