मूर्तिजापूर - राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद - गतीने व परिमणाकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाची अग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाने या योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी प्राधान्याने लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकरी व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच तयार करण्यात येत आहे. या योजनेच्या अनुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये १६ डिसेंबरपासून मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी तहसीलदार बोबडे यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची २१९ पथके तयार करण्यात आली आहे. याकरिता गावनिहाय शिबिर घेण्यात येणार आहे परंतु प्रायोगिक तत्त्वावर धानोरा बु. गावात योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.

