नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा उभारू - शैलेश सूर्यवंशी








अकोला - विधानसभा निवडणूक लागण्याआधी तत्कालीन कामगारमंत्री यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीला पाच हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. परंतु, काही दिवसातच आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे लाभार्थी कामगार योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. त्यामुळे सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन अकोला बिल्डिंग, पेंटर्स व बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी केले.

            अशोक वाटिका येथे ता. १० डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या असोसिएशनच्या बैठकीत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, नोंदणीकृत लाभार्थ्यांना शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुंबई मार्फत मिळणाऱ्या विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी संघटना नेहमीच प्रयत्नशील आहे. आपण एकजुटीने सोबत लढल्यास नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. लाभार्थ्यांना दिवाळीचे पाच हजार रुपये बोनस मिळावे या मागणीसाठी ता. १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात संघटनेच्या वतीने निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले जाणार असल्याचे सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. बैठकीला संघटनेचे सचिव पंचशील गजघाटे, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा ढिसाळे, भास्कर सोनोने, अजिंक्य सूर्यवंशी, अनिल येलकर, छाया सोळंके, देवकाबाई सिरसाट, विशाल घायवट यांच्यासह अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, पातूर, बाळापूर, तेल्हारा तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post