मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न

 


सोलापूर : गुरव समाजाच्या राज्य अधिवेशनासाठी सोलापुरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा आणि काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले आहे . अतिश बनसोडे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आदींनी राष्ट्रीय महापुरूषांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या निषेधार्थ विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. पुण्यात पिंपरी- चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर काळी शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे . सोलापुरातही राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या संबंधित नेत्यांविरूध्द आंदोलनाचे सत्र सुरूच आहे.

रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही सोलापुरात आले असता कोणतेही आक्षेपार्ह आंदोलन किंवा कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. विमानतळापासून ते शासकीय विश्रामगृह आणि गुरव समाजाचे अधिवेशन स्थळ-विजापूर रस्त्यावरील नेहरू नगरच्या शासकीय मैदानापर्यंत पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता.गुरव समाजाचे अधिवेशन संपवून मुख्यमंत्री  व उपमुख्यमंत्री  दोघेही मुंबईला परतण्यासाठी विमानतळाकडे जात असताना अधिवेशन स्थळापासून काही अंतरावर एका कार्यकर्त्याने शिंदे व फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा आणि काळा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न केला. हा कार्यकर्ता घोषणा देत पुढे येत असताना पोलिसांनी त्यास तात्काळ पकडून ताब्यात घेतले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post