सिंदखेड: सायबर जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने सिंदखेड येथील वसंतराव नाईक महाविद्यालय येथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, सोशल मीडिया वापरातील सुरक्षितता आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.
मा.पोलीस अधीक्षक साहेब व माहूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, व्हिडिओ कॉल, लॉटरी किंवा पार्ट-टाईम जॉबच्या नावाने येणारे बनावट संदेश तसेच फिशिंग लिंकवर क्लिक करण्यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. OTP, ATM PIN, UPI PIN, बँक खात्याची माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
सोशल मीडिया वापरताना प्रायव्हसी सेटिंग्ज मजबूत ठेवणे, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्री टाळणे तसेच वैयक्तिक फोटो व माहिती सोशल मीडियावर शेअर करताना काळजी घेण्याबाबत व हल्ली तरुण पिढी ही कमी वयात व्यसणाधिनते कडे वळली त्या पासून तरुणांनी दूर रहावे असेही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या सायबर बुलिंग, ऑनलाइन गेमिंगचे दुष्परिणाम, गेमिंग ॲप्समधून होणारे आर्थिक नुकसान आणि ऑनलाइन फसवणूक याबाबत विशेष माहिती देण्यात आली.
सायबर फसवणूक झाल्यास वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधण्याचे तसेच या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. फसवणुकीनंतर तातडीने तक्रार केल्यास आर्थिक नुकसान रोखण्यास मदत होऊ शकते, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करावा, तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःसह कुटुंबीय व समाजाचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहावे, असा सल्ला सपोनि जोंधळे यांनी दिला.


