सिंदखेड: मागील काळात माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत विविध धार्मिक सण व उत्सव शांततेत, सुव्यवस्थित आणि पारंपरिक पद्धतीने पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सिंदखेड पोलीस ठाण्यात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावांमध्ये बैठका घेऊन आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत नागरिक व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सर्व धर्मीयांमध्ये सलोखा कायम राहावा आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांकडून सातत्याने जनजागृती करण्यात आली.
विशेषतः डीजे व डॉल्बीच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, ध्वनिप्रदूषण तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत पोलिसांनी मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांना माहिती दिली. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
या काळात पत्रकार बांधवांनीही पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून विविध बातम्या प्रसिद्ध करून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्याचबरोबर गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, मंडळांचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केले. त्यामुळे सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत झाली.
“पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयामुळेच सण-उत्सव शांततेत पार पाडणे शक्य झाले. पत्रकारांनी बातम्यांच्या माध्यमातून केलेली जनजागृती, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. या सर्वांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी दिली.
दरम्यान, पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेल्या या कृतज्ञता सोहळ्यामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास व समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, भविष्यातील सण-उत्सवही शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा राखत पार पाडण्यासाठी या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


