शेतकरी संघटनेचा दणका! बोधडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या चौकशीला मुहूर्त

 


19 वा मदत कक्ष दिनात रमेश कदम पाटील यांचा प्रशासनाला जाब; 50 दिवसांपासून प्रलंबित तक्रारीवर अखेर हालचाल



किनवट : शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या शेतकरी संघटनेच्या 19 व्या मदत कक्ष दिनात पंचायत समिती प्रशासनाच्या कारभारावर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. युवा आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनता दिनात बोधडी बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीचा मुद्दा ऐरणीवर आला. संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर या प्रकरणाच्या चौकशीला मुहूर्त मिळाला असून 8 ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी स्वतः बोधडी बु. ग्रामपंचायतीची चौकशी करणार असल्याचे पत्र काढण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेला शेतकरी संघटनेचा मदत कक्ष गेल्या चार महिन्यांपासून दर मंगळवारी पंचायत समिती, किनवट येथे सुरू आहे. या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारी आणि निवेदने प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, चार महिन्यांपासून अनेक निवेदनांवर समाधानकारक कार्यवाही न झाल्याने संघटनेने मंगळवारी प्रशासनाला धारेवर धरले.

50 दिवसांपासून तक्रार धूळखात

बोधडी बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबाबत नागरिकांनी पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार करून तब्बल 50 दिवस उलटूनही चौकशीचे पत्र काढण्यात आले नव्हते, असा आरोप तक्रारदारांनी जनता दिनात केला.

यावर शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रारीवर वेळेत कार्यवाही न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली.

संघटनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत 8 ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी स्वतः बोधडी बु. ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करणार असल्याचे पत्र काढले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या तक्रारीच्या चौकशीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

घरकुल, रोजगार हमीच्या तक्रारीही ऐरणीवर

जनता दिनात घरकुल योजना आणि रोजगार हमी योजनेतील कथित गैरव्यवहारांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींच्या कामांबाबतही अनेक तक्रारी असून त्यांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली.

“नागरिक तक्रारी घेऊन येतात, निवेदने देतात; मात्र त्यावर वेळेत कार्यवाही होत नसेल तर प्रशासनाचा उपयोग काय?” असा सवाल रमेश कदम पाटील यांनी उपस्थित केला.

नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी

पंचायत समितीमध्ये आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही संघटनेने केली.

शंभर-दोनशे किलोमीटर अंतरावरून आपल्या कामासाठी येणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला आणि सामान्य नागरिकांना साधे पाणी व बसण्याची सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.

संघटनेच्या मागणीनंतर मदत कक्षाच्या ठिकाणी दोन पंखे बसविण्यासह नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि बैठक व्यवस्था करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

‘मदत कक्ष बंद होणार नाही’

मदत कक्ष हा केवळ तक्रारी स्वीकारण्याचा उपक्रम नसून सामान्य नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला.

यावेळी “सामान्य माणसाला न्याय मिळेपर्यंत मदत कक्ष सुरूच राहील. प्रशासनाने लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये,” असा इशारा रमेश कदम पाटील यांनी दिला.

कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते त्रिभुवनसिंह ठाकूर, विठ्ठलराव दांडेगावकर, दादाराव डोंगरे, उत्तम डोंगरे, विक्रांत ईजारे, शोभाताई कुमरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रकाश गब्बा राठोड यांनी शेतकरी संघटनेच्या मदत कक्षाचे कौतुक करत, हा उपक्रम नियमित सुरू राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच पुढील मंगळवारी पुन्हा मदत कक्षात उपस्थित राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बोधडी बु. ग्रामपंचायतीच्या चौकशीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post