जलसाठ्यात घट ; नगर परिषदेकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन,नगराध्यक्ष हर्षल साबळे, मुख्याधिकारी नीलेश जाधव यांचे नागरिकांना आवाहन
मुर्तिजापूर : यंदा शहर व परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. परिणामी शहरावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट निर्माण झाले असून आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूर नगर परिषद प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे काटकसरीने नियोजन सुरू केले आहे.शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय झाल्यास भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ गरजेपुरताच करावा आणि पाण्याची बचत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष हर्षल साबळे व मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी केले आहे.
नळांना तोट्या बसविणे, नळांची गळती तातडीने दुरुस्त करणे, अंगण व वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळणे, तसेच सार्वजनिक नळ व हातपंपावरून पाणी भरल्यानंतर नळ व्यवस्थित बंद करणे, या बाबींकडे नागरिकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तसेच इमारती व घरांमध्ये पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करण्यावर भर देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शहरातील नागरिक, व्यापारी तसेच विविध सामाजिक संस्थांनी पाणी बचतीच्या या प्रयत्नात सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.
* पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा
सध्याची परिस्थिती लक्षात घेता " पाणी हेच जीवन आहे " या भावनेतून प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. आज वाचविलेला पाण्याचा प्रत्येक थेंब भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी बचतीला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
