किनवटमध्ये आज भव्य ऑल इंडिया मुशायरा; देशभरातील नामवंत शायरांची उपस्थिती

 

किनवटमध्ये आज भव्य ऑल इंडिया मुशायरा; देशभरातील नामवंत शायरांची उपस्थिती

‘एक शाम एकता के नाम’ संकल्पनेतून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश



किनवट : सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने किनवट शहरात आज, मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी भव्य ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक शाम एकता के नाम’ या संकल्पनेतून आयोजित हा काव्यमय सोहळा सायंकाळी ७ वाजता सुभाषनगर येथील व्ही.आर. गार्डनमध्ये रंगणार आहे.

या मुशायऱ्यात देशातील विविध भागांसह महाराष्ट्रातील नामवंत शायर सहभागी होणार असून, आपल्या दमदार शायरीतून ते रसिकांना काव्याचा आनंद देणार आहेत. या कार्यक्रमात शकील आजमी (मुंबई), बिलाल सहारनपुरी (सहारनपूर, उत्तर प्रदेश), हामिद भुसावली (भुसावळ), नईम फराझ (अकोला), एजाज बिस्मिल (अकोट), मुजावर मालेगावी (मालेगाव), अलतमश तालिब (नांदेड), तौहिद मलनस (किनवट), ॲड. साद मलिक, बिलाल अनवर आणि उझेर मुहिब (औरंगाबाद) यांच्यासह अनेक शायर आपल्या रचना सादर करणार आहेत.

या काव्यसंध्येचे सूत्रसंचालन अर्थात निजामत इंदूर येथील प्रसिद्ध सूत्रसंचालक सतलज इंदोरी करणार आहेत. प्रेम, बंधुभाव, मानवी मूल्ये आणि सामाजिक ऐक्य यांसारख्या विषयांवरील शायरीच्या माध्यमातून उपस्थितांना एकतेचा संदेश देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या मुशायऱ्याचे आयोजन भाजप अल्पसंख्याक आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड. माझ बडगुजर (किनवट) यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने किनवट शहरात साहित्यप्रेमी आणि काव्यरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

किनवट शहरासह तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांनी, साहित्यप्रेमींनी तसेच काव्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मुशायऱ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी : प्रदीप कुमार सावते, किनवट
ग्रामीण प्रतिनिधी : धिरज साळुंखे

Post a Comment

Previous Post Next Post