दुष्काळग्रस्त शेतकरी-शेतमजुरांना मुंबईत निवारा द्या!

 


रयत क्रांती संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष प्रिया राऊत यांचे महापौर रितूताई तावडे यांना निवेदन


मुंबई | गाव सहेली नेटवर्क 

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि ग्रामीण भागातील रोजगाराचा अभाव यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व शेतमजुरांना मुंबईत तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्याच्या युवती प्रदेशाध्यक्ष प्रिया राऊत यांनी मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रोजगाराच्या शोधात मुंबईत येणाऱ्या शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आणि ग्रामीण भागात पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी व शेतमजूर कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबासह रोजगाराच्या शोधात मुंबईत येणाऱ्या नागरिकांना फुटपाथवर किंवा उघड्यावर राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे प्रिया राऊत यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शेतकरी कुटुंबांमध्ये भविष्याबाबत चिंता

शेतकऱ्यांचे आर्थिक संकट केवळ त्यांच्या उत्पन्नापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत आहे. कर्जबाजारीपणा, शेतीतील नुकसान आणि आर्थिक विवंचनेमुळे अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्या वडिलांच्या भविष्याची चिंता सतावत असून, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे प्रिया राऊत यांनी अधोरेखित केले.

“शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्या वडिलांच्या आत्महत्येची भीती मनात घेऊन जगावे लागणे, ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. राज्याच्या विकासाच्या चर्चेत शेतकरी आणि शेतमजुरांच्या जगण्याच्या प्रश्नालाही प्राधान्य मिळाले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी निवेदनातून मांडली.

मुंबईच्या उभारणीत शेतकरी-शेतमजुरांचे योगदान

मुंबईच्या उभारणीत शेतकरी व शेतमजुरांच्या श्रमांचे मोठे योगदान आहे. शहरातील इमारती, रस्ते आणि विविध बांधकामांमध्ये मजुरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच मुंबईकरांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणारा अन्नधान्य आणि भाजीपाला ग्रामीण भागातील शेतकरी पिकवतात. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व शेतमजूर वर्गाला मदतीचा आधार देणे आवश्यक असल्याचे प्रिया राऊत यांनी म्हटले आहे.

महापौरांकडून सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा

मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांनी या मागणीची दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात. रोजगाराच्या शोधात मुंबईत येणाऱ्या दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांसाठी योग्य ठिकाणी तात्पुरती निवारा केंद्रे उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती प्रिया राऊत यांनी केली आहे.

शेतकरी व शेतमजुरांना संकटाच्या काळात सुरक्षित निवारा आणि मूलभूत सुविधा मिळाल्यास त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा रयत क्रांती संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष प्रिया राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post