उपोषण बातमी| दहा दिवसांच्या बेमुदत उपोषणाला अखेर यश

 




पीडित महिलेच्या तक्रारीतील पाच नावे गुन्ह्यात समाविष्ट


विभागीय संपादक| निलेश रामगावकर‌ 


अचलपूर : कवठा बु. ग्रामपंचायत कार्यालयातील तक्रार निवारण शिबिरादरम्यान महिलेला मारहाण, जातीवाचक व अपमानास्पद शिवीगाळ तसेच विनयभंगाचा प्रयत्न केल्याच्या आरोपांप्रकरणी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा अखेर मंगळवारी सायंकाळी तोडगा निघाला. पीडित महिलेच्या मागणीनुसार तक्रारीतील उर्वरित पाच व्यक्तींची नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आल्यानंतर दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण तिने मागे घेतले.

पीडित महिलेच्या बयाणाच्या आधारे जाधव, पांडे, विनयकुमार कंडु, विशाल देंगे आणि साकोम या पाच व्यक्तींची नावे संबंधित गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी महिलेने केली होती.

अचलपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून तिचे बेमुदत उपोषण सुरू होते. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका तिने घेतली होती.

दरम्यान, उपोषणाच्या दहाव्या दिवशी मंगळवारी महिलेची प्रकृती खालावल्याने पोलिसांचा बंदोबस्त तसेच रुग्णवाहिकेसह पथक आंदोलनस्थळी दाखल झाले. तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद नरवरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष किशोर मोहोड यांनी प्रशासनाशी चर्चा करून मध्यस्थी केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेण्याची कारवाई थांबवली आणि रुग्णवाहिकाही परत पाठविण्यात आली.

एसडीओंची आंदोलनस्थळी भेट

उपोषणादरम्यान उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पीडित महिलेची बाजू ऐकून घेतली होती. तक्रारीतील उर्वरित पाच व्यक्तींची नावे गुन्ह्यात समाविष्ट झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी महिलेने आपले बेमुदत उपोषण सोडले.

दरम्यान, प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्यता तपासावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post