वर्ग दोन जमिनीचे फार्मर आयडीची अडचण तात्काळ सोडवा अन्यथा; रास्ता रोको - रमेश कदम पाटील

 





28 सप्टेंबरला इस्लापूर नाका येथे आंदोलनाचा इशारा; इस्लापूर पोलिसांना निवेदनाची प्रत



इस्लापूर, ता. किनवट : भोगवटादार वर्ग-२ जमिनीच्या नोंदींमुळे किनवट तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना Farmer ID मिळण्यात अडचणी येत असून, त्याचा थेट परिणाम कर्जमाफीच्या KYC प्रक्रियेवर होत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शेतकरी संघटनेने प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास दि. 28 सप्टेंबर रोजी सोमवारी दुपारी 12.00 वाजता इस्लापूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी दिली.


किनवट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटादार वर्ग-२ स्वरूपाच्या आहेत. सध्याच्या महसूल अभिलेखातील नोंदी आणि Farmer ID निर्मितीच्या डिजिटल प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे संबंधित शेतकऱ्यांचे Farmer ID तयार होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. Farmer ID अभावी कर्जमाफीसाठी आवश्यक KYC पूर्ण करता येत नसल्याने पात्र लाभार्थी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.


सन 2016 मध्ये वर्ग-2 जमिनींच्या प्रतवारीत झालेल्या बदलामुळे लागवडीयोग्य क्षेत्रही “पोट खराब” म्हणून नोंदविले गेल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. महसूल अभिलेखातील या नोंदींचा फेरआढावा घेऊन प्रत्यक्ष लागवडीयोग्य क्षेत्राची नोंद दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.


मृत लाभार्थ्यांच्या KYCचा प्रश्नही ऐरणीवर


कर्जमाफीसाठी शासनाने माहिती संकलित केल्यानंतर काही लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. अशा लाभार्थ्यांना स्वतः KYC करता येत नसून, काही प्रकरणांत जमिनीवर वारसांची नोंदही झालेली नाही. त्यामुळे कायदेशीर वारसाच्या माध्यमातून अथवा शासनाने निश्चित केलेल्या पर्यायी प्रक्रियेद्वारे KYC पूर्ण करून पात्र कुटुंबाला कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


28 सप्टेंबरला शेतकरी बैठक


या प्रश्नावर प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता साई मंगल कार्यालय, इस्लापूर येथे बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस तहसीलदार किनवट यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.


तथापि दुपारी 12 वाजेपर्यंत प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्यास इस्लापूर नाका येथे किनवट–नांदेड महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा रमेश कदम पाटील यांनी दिला.


दरम्यान, आंदोलनाची पूर्वसूचना म्हणून इस्लापूर पोलीस स्टेशनला निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. यावेळी इस्लापूर सर्कल प्रमुख भारत राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व पोलीस प्रशासनातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.


“शासकीय अभिलेखातील त्रुटी अथवा डिजिटल प्रक्रियेतील अडचणींचा फटका पात्र शेतकऱ्यांना बसता कामा नये. Farmer ID, KYC आणि वर्ग-2 जमिनींच्या नोंदींचा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. प्रशासनाने वेळेत ठोस पाऊल उचलावे; अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असे रमेश कदम पाटील यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post