किनवटमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद; व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 



एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी शहर दणाणले; सकल मराठा समाजाचा बाजारपेठेत जनजागृती फेरी


किनवट नांदेड



किनवट : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित व सुरू असलेल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्रभर विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. काही ठिकाणी या बंदला शंभर टक्के, तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर आज दि. ४ सप्टेंबर रोजी किनवट शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली. यानिमित्ताने सकल मराठा समाजाचे बांधव जिजामाता चौकात मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील प्रमुख बाजारपेठेत जनजागृती फेरी काढण्यात आली. व्यापारी बांधवांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला किनवट शहरातील व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला किनवटमध्ये मिळालेला हा प्रतिसाद समाजातील एकजुटीचे दर्शन घडविणारा ठरला. शहरातील विविध भागांत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थितीवर प्रशासन व पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post