कोच्ची-मोहदा मार्गावर युवकाला अडवून लाखोंची लूट



तालुका प्रतिनिधी निजामोद्दिन सोलंकी 

घाटंजी : कोच्ची-मोहदा मार्गावरील शेतशिवारात तिघा अज्ञात चोरट्यांनी एका २५ वर्षीय युवकाला रस्त्यात अडवून मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील सुमारे **१ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला.**


ही घटना भरदिवसा घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून कोच्ची-मोहदा मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


प्राप्त माहितीनुसार, **आर्णी येथील युवक आर्यन राजवानी** वय २५, हा दुचाकीने कोच्ची येथे येत असताना दुपारी सुमारे २ वाजता कोच्ची-मोहदा मार्गावरील शेतशिवारात तिघा अज्ञात चोरट्यांनी त्याला अडवले. चोरट्यांनी मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण **१ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज** जबरदस्तीने हिसकावून घेतला.


घटनेनंतर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. आर्यन हा अमेरिकेत वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वी भारतात परतला होता. मात्र, भारतभेटीदरम्यान त्याला भरदिवसा लुटीला सामोरे जावे लागले.

घटनेची माहिती मिळताच **घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.** याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. **पोलीस निरीक्षक केशव ठाकरे** यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन राठोड, पोलीस उपनिरीक्षक विनाश जाधव, दिनेश जाधव, प्रवीण तालकेपेलवार, अरविंद चेमटे व प्रलय खोबरकर पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post