वही-पेन व शैक्षणिक साहित्य वाटपातून सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश
गावाकडची बातमी पंकज जयस्वाल नांदेड मो.9421367593
१ सप्टेंबर : वाढदिवस म्हटला की केक, शुभेच्छा आणि उत्सव हे सर्वसाधारण चित्र असते; मात्र आमदार भीमराव केराम यांचे स्वीय सहायक प्रकाश कुडमते यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत तो आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
अंजनखेड येथे शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन तसेच विविध शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि त्यांच्या बालमनातील उत्साहाने संपूर्ण परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले.
“वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांसोबत वाटला, तर त्या आनंदाला खरा अर्थ प्राप्त होतो,” या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमास असशिस आडावे, विजय मडावी, प्रदीप भालेवाड, अजय भगत, गुलाब सांगणवाड, दिगंबर वाघाडे, वसंत पाटील यांच्यासह अंजनखेड येथील अनेक युवक, ग्रामस्थ व हितचिंतक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या हातात वही-पेन देताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि “आम्हालाही शिकायचे आहे, पुढे जायचे आहे” या बालमनातील स्वप्नांना मिळालेली प्रेरणा हीच प्रकाश कुडमते यांच्या वाढदिवसाची सर्वात सुंदर भेट ठरली.
वाढदिवस साजरा करण्याची नवी संकल्पना — आनंद स्वतःचा, पण समाधान समाजाचे!

