महिला पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


Indian journalist association


अहिल्यानगर : दिल्लीतील पत्रकार शाहीन खान (4PM न्यूज नेटवर्क) आणि स्वतंत्र पत्रकार नफीसा खान यांच्यासोबत दिल्ली पोलिसांकडून कथित मारहाण व गैरवर्तन झाल्याच्या निषेधार्थ इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे सात सूत्रीय निवेदन सादर केले.


घटनेची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पोलिसांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पत्रकारांना धमकी, मारहाण, जबरदस्तीने रोखणे, उपकरणे हिसकावणे किंवा रिपोर्टिंगमध्ये अडथळा आणण्याच्या घटनांमध्ये तातडीने एफआयआर दाखल करून वेळेत तपास करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच पत्रकारांविरोधात दाखल होणाऱ्या कथित खोट्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी विशेष यंत्रणा उभारून पत्रकारांना कायदेशीर मदत देण्याची मागणी करण्यात आली.


जिल्हाध्यक्ष नासिर जमीर सैय्यद म्हणाले, “कलम आणि कॅमेऱ्याची आवाज दाबता येणार नाही. पत्रकारांवरील अन्यायाविरोधात इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन ठामपणे उभे राहील.” महिला पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षेसाठी संघटना कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.


जिल्हा महासचिव अंसार सैय्यद यांनी पत्रकारांना भयमुक्त वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे सांगत पत्रकार सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली.

निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांनाही पाठविण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष नासिर जमीर सैय्यद, जिल्हा महासचिव अंसार सैय्यद, जिल्हा सचिव अर्शीद सैय्यद, जिल्हा संघटन सचिव गोरख दहीफळे, जिल्हा मीडिया प्रभारी सूरज गवारे, परिषद सदस्य जिया सैय्यद, किरण कांबळे, शहबाज सैय्यद यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post