महसूल मंडळ स्तरावर १५ व १६ सप्टेंबरला विशेष शिबिरे

 



कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी प्रशासनाची विशेष मोहीम


गावाकडची बातमी | माहूर, किनवट

प्रतिनिधी पंकज जयस्वाल | मो. ९४२१३६७५९३


माहूर तालुक्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे १५ व १६ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहेत.


१५ सप्टेंबर रोजी माहूर व बाई (बा.) मंडळात, तर १६ सप्टेंबर रोजी सिंदखेड व वानोळा मंडळात शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.


शिबिरात जुन्या कुणबी नोंदींची पडताळणी, नवीन अर्ज स्वीकारणे, वंशावळ व आवश्यक कागदपत्रांची जुळवणी तसेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. महसूल विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांचे संयुक्त पथक यावेळी उपस्थित राहणार आहे.


नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे व वंशावळीशी संबंधित पुरावे घेऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केले आहे. याबाबत गावपातळीवर दवंडी, ग्रामपंचायत नोटीस फलक व स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


कायदेशीर नियम व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच प्रमाणपत्रांची प्रक्रिया केली जाणार असून पात्र नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post