पत्रकारिता, अभिनय व दिग्दर्शनातील उल्लेखनीय योगदानाची दखल; लक्ष्मीकांत मुंडे यांची ‘महाराष्ट्र पर्व कला गौरव पुरस्कार–२०२६’साठी निवड

 



किनवट : पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड आणि सातत्यपूर्ण लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडतानाच अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे किनवट येथील ज्येष्ठ पत्रकार, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते लक्ष्मीकांत मुंडे यांची प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र पर्व कला गौरव पुरस्कार–२०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे किनवटसह नांदेड जिल्ह्याच्या कला व पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज’च्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी लक्ष्मीकांत मुंडे यांच्या कला व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेसोबतच अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातील कार्याची विशेष नोंद घेण्यात आली आहे.




लक्ष्मीकांत मुंडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण व सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रशासन, सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा अभाव तसेच समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविला आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम न राहता समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे प्रभावी साधन ठरावे, या भूमिकेतून त्यांचे कार्य सुरू आहे.

पत्रकारितेबरोबरच कला क्षेत्राशी असलेली त्यांची नाळही तितकीच घट्ट आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्जनशीलतेला वेगळी दिशा दिली. सामाजिक जाणिवा आणि कलात्मक दृष्टिकोन यांचा सुरेख मेळ त्यांच्या कार्यात पाहायला मिळतो. त्यामुळेच त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्र पर्व कला गौरव पुरस्कार–२०२६’ साठी त्यांची निवड करण्यात आल्याचे निवडपत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पुरस्काराचे आयोजन हिमायतनगर येथे करण्यात येणार असून, आपल्या कलाप्रवासातील या महत्त्वपूर्ण सन्मानासाठी लक्ष्मीकांत मुंडे यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा, असे निवडपत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकारिता आणि कला क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाला मिळालेली ही पावती म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात असून, त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post