‘हिंदवीस्वराज’ बाल गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम ; १२ दिवस विविध सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
मूर्तिजापूर : गणेशोत्सव म्हटला की डीजेचा दणदणाट, रोषणाई आणि मनोरंजनाचे कार्यक्रम असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, या पारंपरिक चित्राला फाटा देत मूर्तिजापूर शहरातील गणेश नगर परिसरातील चिमुकल्यांनी गणेशोत्सवाला सामाजिक प्रबोधन, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. स्टेशन विभागातील नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदा पहिल्याच वर्षी स्थापन केलेल्या हिंदवीस्वराज बाल गणेश उत्सव मंडळा’ने १२ दिवस विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवत गणेशोत्सवाची खरी संकल्पना जपण्याचा प्रयत्न केला.गणेशोत्सवानिमित्त आयोजित समाजप्रबोधन कार्यक्रमात राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजेरी वादक संदीपपाल महाराज यांनी उपस्थितांना सामाजिक एकोपा, माणुसकी, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि समाजसुधारणेचा संदेश दिला. यावेळी त्यांनी कावड यात्रा, उत्सवांमधील वाढते मनोरंजनाचे स्वरूप आणि डीजेच्या दणदणाटावर भाष्य करत समाजप्रबोधनाची गरज अधोरेखित केली.
“कावड यात्रेत नटी नाचवायच्या, हीच का आपली भारतीय संस्कृती? डीजेच्या दणदणाटापेक्षा समाजप्रबोधनाचा आवाज मोठा झाला पाहिजे,” असा सवाल संदीपपाल महाराज यांनी उपस्थित केला. कोरोना महामारीने संपूर्ण मानवजातीला माणुसकीचा धडा शिकविला असून, माणुसकी हाच खरा धर्म’ या विचाराची जपणूक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भाच्या भूमीत संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारखे महान समाजसुधारक जन्माला आले. त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद दूर करणे आणि सामाजिक सुधारणेचा संदेश दिला. संतांनी दाखविलेल्या मार्गावर चालत समाजात भांडणे, द्वेष आणि विभाजन निर्माण करण्याऐवजी बंधुभाव, माणुसकी आणि सामाजिक एकोपा वाढविणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.या समाजप्रबोधन कार्यक्रमाला नगरसेवक, समाजसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी चिमुकल्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लहान वयात मोठा सामाजिक विचार घेऊन गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ‘हिंदवीस्वराज बाल गणेश उत्सव मंडळा’च्या उपक्रमाची शहरात चर्चा होत असून, बाल कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
---------------------------------------------------
* टिळकांच्या संकल्पनेची चिमुकल्यांकडून जपणूक
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्याच मूळ संकल्पनेला अनुसरून या चिमुकल्यांनी उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड दिल्याचे पाहायला मिळाले. केवळ मनोरंजनापुरता गणेशोत्सव मर्यादित न ठेवता समाजासाठी काहीतरी करण्याची भावना बालवयातच रुजविण्याचा या मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे संदीपपाल महाराज यांनी सांगितले.
---------------------------------------------------
बालवयातच सामाजिक बांधिलकीचा संस्कार
‘हिंदवीस्वराज बाल गणेश उत्सव मंडळा’च्या माध्यमातून १२ दिवस विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमातून बाल कार्यकर्त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली. त्यामुळे गणेशोत्सवाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या चिमुकल्यांनी शहरासमोर ठेवला आहे.

