यवतमाळात २३ सप्टेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चा

 

Maharashtra


कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक



यवतमाळ : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी यवतमाळ येथे शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता आझाद मैदान येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.


या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांचे आर्थिक अनुदान द्यावे, पीक विमा योजनेतील पूर्वीचे चार ट्रिगर तात्काळ पूर्ववत करून नुकसानीची योग्य नुकसानभरपाई द्यावी, तसेच आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, या मागण्यांचा समावेश आहे.


याशिवाय शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा, कृषी पंपांसाठी सोलारऐवजी पुन्हा वीज कनेक्शन देण्यास सुरुवात करावी, नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत १२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


कर्जाचे पुनर्गठन केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा तसेच कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशाही मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.


“शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही” असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर आणि आर्णी-केळापूर विधानसभा प्रमुख दयानंद सोयाम करणार आहेत.

मोर्चासाठी शिवसेना, महिला आघाडी आणि युवासेना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने प्रविण शिंदे, किशोर इंगळे आणि संजय निखाडे यांनी शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post