आधुनिकतेच्या लाटेत मातंग समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर संकट; व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ
Editor -मिलींद जामनिक
मूर्तिजापूर : लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव, मिरवणुका आणि विविध सामाजिक कार्यक्रमांची शोभा वाढविणाऱ्या पारंपरिक बॅण्ड पार्टीचा आवाज आता डीजेच्या दणदणाटात हरवत चालला आहे. आधुनिक ध्वनिव्यवस्थेच्या वाढत्या वापरामुळे मातंग समाजाचा पिढ्यान्पिढ्या सुरू असलेला पारंपरिक बॅण्ड व्यवसाय मोठ्या संकटात सापडला असून, कार्यक्रमांची संख्या घटल्याने अनेक व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पारंपरिक वाद्ये वाजविणे हा मातंग समाजातील अनेक कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय राहिला आहे. पूर्वी लग्नसमारंभ असो अथवा धार्मिक मिरवणूक, बॅण्ड पार्टीशिवाय कार्यक्रमाची कल्पनाच केली जात नव्हती. ढोल, ताशा, ट्रम्पेट, सनई यांसह विविध पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी वातावरण उत्साहमय होत असे. या व्यवसायातून अनेक कुटुंबांना वर्षभर रोजगार मिळत होता.
मात्र, मागील काही वर्षांत डीजे संस्कृतीचा वाढता प्रभाव या पारंपरिक व्यवसायासाठी मोठे आव्हान ठरला आहे. लग्नसमारंभ, मिरवणुका आणि इतर कार्यक्रमांमध्ये पारंपरिक बॅण्डऐवजी डीजेला प्राधान्य दिले जात असल्याने बॅण्ड पार्टीला मिळणाऱ्या सुपाऱ्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
वाद्यांची देखभाल, नवीन वाद्यांची खरेदी, गणवेश, वाहतूक तसेच कलाकारांचे मानधन असा खर्च नियमितपणे करावा लागतो. मात्र कार्यक्रमच कमी मिळत असल्याने हा खर्चही परवडेनासा झाला आहे. अनेक कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. पारंपरिक कला आणि व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी समाजाने तसेच आयोजकांनी पारंपरिक बॅण्डला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होत आहे.
---------------------------------------------------
आमच्या कुटुंबाचा हा व्यवसाय अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. पूर्वी लग्न किंवा मिरवणूक म्हटली की बॅण्ड पार्टीला आवर्जून बोलावले जायचे. आता बहुतांश कार्यक्रमांमध्ये डीजेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे महिन्यातून एखादाच कार्यक्रम मिळतो. वाद्यांची देखभाल आणि कलाकारांचा खर्च भागविणेही कठीण झाले आहे. आमच्यासारख्या अनेक व्यावसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. पारंपरिक कला टिकवायची असेल तर बॅण्ड व्यवसायाला पुन्हा प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.
विलास सावळे, व्यवसायीक
मूर्तिजापूर
