पशुधन विम्याबाबत जनजागृती व १०० टक्के पशुधन विमा संरक्षणाची मागणी; सहायक आयुक्त पशुसंवर्धनांना निवेदन
किनवट : शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध शासकीय अडचणी सोडविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचायत समिती, किनवट येथे सुरू असलेल्या मदत कक्षाच्या १६ व्या दिवशी तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. यावेळी एकूण ३४ नागरिकांच्या तक्रारी नोंदवून संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या.
सोळाव्या मदत कक्षाचा विशेष विषय म्हणून किनवट तालुक्यातील सर्व पात्र पशुधनाचा विमा करण्यासाठी व्यापक जनजागृती करून १०० टक्के पशुधन विमा संरक्षित करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भातील सविस्तर निवेदन सहायक आयुक्त पशुसंवर्धन, किनवट संजीव पाटील यांना देण्यात आले.
पशुधन हे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, अपघात, नैसर्गिक आपत्ती, रोगराई किंवा अन्य कारणांमुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शासनाच्या पशुधन विमा योजनेची माहिती प्रत्येक पशुपालकापर्यंत पोहोचवून एकही पात्र पशुधन विम्याविना राहू नये, यासाठी गावनिहाय जनजागृती मोहीम व विशेष विमा नोंदणी शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
पशुधन विमा योजनेतील पात्रता, विमा हप्ता, शासनाचे अनुदान, विमा संरक्षणाची रक्कम, Ear Tag, आरोग्य प्रमाणपत्र तसेच विमा दावा प्रक्रियेबाबत पशुपालकांना सुलभ भाषेत माहिती देण्यात यावी. तसेच विमा दावा करताना पशुपालकांना अनावश्यक अडचणी येऊ नयेत यासाठी विभागाने स्वतंत्र मार्गदर्शन व्यवस्था निर्माण करावी, अशीही मागणी करण्यात आली.
३४ तक्रारी प्रशासनासमोर
मदत कक्षाच्या माध्यमातून आज ३४ नागरिकांच्या विविध तक्रारी व शासकीय कामांशी संबंधित अडचणी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. संबंधित विभागांकडून या तक्रारींची दखल घेऊन पात्र नागरिकांना त्यांच्या हक्काच्या शासकीय सेवा व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी सहायक आयुक्त पशुसंवर्धन संजीव पाटील, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) निरंजन बागल, शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील, अशोक शेलार, विनायक टारपे, निवृत्त पोलीस निरीक्षक गंगाधर राठोड यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
“पशुधन सुरक्षित तर शेतकरी सुरक्षित”
यावेळी बोलताना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पशुधनाचा विमा हा शेतकऱ्याच्या आर्थिक सुरक्षेचा महत्त्वाचा आधार आहे. शासनाच्या योजनेचा लाभ केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्ष प्रत्येक पात्र पशुपालकापर्यंत पोहोचला पाहिजे. किनवट तालुक्यात १०० टक्के पात्र पशुधन विमा संरक्षित करण्यासाठी प्रशासनाने विशेष अभियान राबवावे.”
शेतकरी संघटनेचा मदत कक्ष हा केवळ तक्रारी स्वीकारण्यापुरता मर्यादित नसून सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे व्यासपीठ म्हणून काम करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

