‘सिबिल खराब आहे, गेट आऊट’ म्हणत शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्याचा आरोप
माहूर/किनवट : कोरडवाहू माहूर व किनवट तालुक्यात यंदा पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडून कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर नव्याने पीककर्ज मिळेल, या अपेक्षेने बँकांमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना ‘सिबिल खराब आहे’ तसेच सामाईक गटातील नावांमुळे कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
माहूर तालुक्यातील वाई बाजार आणि किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांमध्ये हा प्रकार सुरू असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार हेमंत पाटील यांचे निवेदन घेऊन २१ सप्टेंबर रोजी नांदेड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय अधिकारी कार्यालयात धडक देत आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख रविभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्जप्रकरणात होत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी केली. यावेळी जीवला नाईके, साहेबराव जाधव, दिनेश राठोड, रमेश राठोड, वसंत जाधव, सागर राठोड, कुवरसिंग राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

