कलगाव शिवारात बिबट्याची दहशत; वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

 



दर दोन दिवसांनी बिबट्याचे दर्शन; दूध घेऊन परतणाऱ्या शेतकऱ्याचा केला पाठलाग


प्रतिनिधी श्रीकांत राऊत महागांव यवतमाळ 


महागाव : महागाव तालुक्यातील कलगाव शिवारात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर दोन दिवसांनी बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार बिबट्या नजरेस पडत असतानाही वनविभागाकडून ठोस कारवाई कधी होणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

शनिवार, दि. २९ रोजी सायंकाळी शेतातून दूध काढून घेऊन परतत असताना आशिष भवानकर यांचा बिबट्याने पाठलाग केल्याची घटना घडली. अचानक बिबट्या समोर आल्याने भवानकर यांनी जीव वाचवण्यासाठी जवळील गोठ्याच्या परिसरातील ट्रॅक्टर-ट्रॉलीचा सहारा घेतला. यावेळी त्यांनी रोडवर असलेल्या दगडाचा आधार घेत बिबट्याकडे दगड फेकल्याने बिबट्या मागे फिरला आणि मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणखी भीती निर्माण झाली आहे. शेतीची कामे, जनावरांना चारा देणे तसेच दूध काढण्यासाठी शेतात जाण्याची वेळ आली की शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.


##चौकट## 


वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?


कलगाव शिवारात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असतानाही त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. एखाद्या व्यक्तीवर किंवा जनावरावर हल्ला झाल्यानंतरच वनविभाग जागा होणार का? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी कॅमेरे व पिंजरा लावावा, तसेच शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

“जीव वाचवण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा घेतला आधार”

बिबट्याने पाठलाग केल्यानंतर आशिष भवानकर यांनी प्रसंगावधान राखत जवळील ट्रॅक्टर-ट्रॉलीचा आधार घेतला. दगड फेकल्यानंतर बिबट्या मागे फिरल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. वारंवार अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post