१०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाचीही तोड? परवानगी व NOC तपासण्याची नागरिकांची मागणी

 


PWD रस्त्याच्या हद्दीत विनापरवानगी विद्युत पोल उभारल्याचा आरोप; ग्रामस्थांची कारवाईची मागणी


विभागीय संपादक निलेश रामगावकर 


शिराळा प्रतिनिधी : अमरावती–चांदूर बाजार या सार्वजनिक मुख्य मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) हद्दीत कोणतीही पूर्वपरवानगी किंवा आवश्यक NOC न घेता विद्युत पोल उभारण्यात आल्याचा आरोप करीत शिराळा येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.


नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित कंपनी अथवा कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या हद्दीत विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. मात्र, या कामासाठी PWDची पूर्वपरवानगी घेण्यात आली आहे किंवा नाही, याबाबत कोणतेही अधिकृत दस्तऐवज अथवा NOC नागरिकांना दाखविण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


तसेच PWDच्या अखत्यारितील रस्ता किंवा फुटपाथची तोडफोड करून खड्डे करण्यात आले असून, त्यामध्ये विद्युत पोल उभारण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे का, तसेच संबंधित कामासाठी कोणत्या विभागाची परवानगी घेण्यात आली आहे, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


१०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाबाबतही प्रश्न


विद्युत पोल उभारणीच्या कामात सुमारे १०० वर्षे जुने वडाचे झाड अडथळा ठरत असल्याने ते तोडण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर झाड तोडण्यासाठी ग्रामस्थांची परवानगी नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


झाड तोडण्यास वन विभाग, ग्रामपंचायत अथवा संबंधित सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली आहे का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


वाहतुकीला अडथळा; अपघाताचा धोका


मुख्य रस्त्याच्या हद्दीत अथवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी विद्युत पोल उभारण्यात आल्यास वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भविष्यात या पोलमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये, यासाठी PWDने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.


याशिवाय, रस्त्यालगतच्या गटारांच्या हद्दीत भूमिगत केबल टाकण्याचे काम करण्यात आले असल्यास त्याचीही तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

PWDची आवश्यक परवानगी किंवा NOC नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित विद्युत पोल तात्काळ हटवावेत, सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान भरून काढावे आणि संबंधित जबाबदार व्यक्ती अथवा कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ही तक्रार २७ ऑगस्ट २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), अमरावती यांच्याकडे सादर करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संबंधित विभागीय कार्यालयालाही तक्रारीची प्रत देण्यात आली आहे.

तक्रारीवर श्रीकांत कापसे, गौरव उमके, सुधीर शेंडे, ऋषिकेश खाडे, अभिजीत देशमुख, निखिल सोलोव, राजेश सोलोव, वेदांत भोंडे, रोहित केचे, विशाल लोंदे, दर्शन खाडे, वैभव ठाकरे, वनराज मोहोळ, वामनराव ठाकरे, डॉ. देवतारे, डॉ. समीर बाला, प्रशांत मानेकर, प्रवीण मानेकर, सतीश कुसटकर, रविभाऊ कुसटकर, समीर कुसटकर, संतोष इंगळे, सोनू कदम यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

आता PWD व महावितरण प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करणार का आणि संबंधित कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post