स्वर्गीय आमदार प्रदीपजी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माहूरमध्ये भव्य महाप्रसाद

 


नांदेड


स्वर्गीय आमदार प्रदीपजी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माहूरमध्ये भव्य महाप्रसाद

नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम; ५ क्विंटल मसाला भात व व्हेज बिर्याणीचे वाटप




माहूर : दानशूर व्यक्तिमत्त्व आणि जनतेप्रती पालकत्वाची भावना जपणारे माहूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या वतीने स्वर्गीय आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माहूर येथे भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे ५ क्विंटल मसाला भात व व्हेज बिर्याणी भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली.

माहूर नगरीत विविध धार्मिक उत्सव, यात्रा आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. भाविकांच्या सेवेसाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडून सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सव, दत्त जयंती, ईद-ए-मिलादुन्नबी, गणेश विसर्जन, सरकार सोना पीर बाबा उरूस तसेच विविध यात्रा-उत्सवांच्या काळात पिण्याचे पाणी, महाप्रसाद, उपवासासाठी खिचडी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून केले जाते.

माहूरच्या यात्रांमध्ये लाखो भाविक सहभागी होत असल्याने विविध ठिकाणी महाप्रसादाचे स्टॉल उभारले जातात. मात्र, नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे केवळ आयोजन करून थांबत नसून, स्वतः उपस्थित राहून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करतात. त्यांच्या या आपुलकीच्या आणि सेवाभावी भूमिकेचे भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

“भाविकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत फिरोज दोसानी यांचे सेवाकार्य सुरू असल्याचे यावेळी दिसून आले. त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे माहूर शहरात सेवाभावी नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

या महाप्रसाद वितरणावेळी उपनगराध्यक्ष नाना भाऊ लाड, नगरपालिका अकाउंटंट मरेवाड साहेब, ओ.एस. गजलवाड साहेब, नगरसेविका प्रतिनिधी आकाश कांबळे, अफसर अली, विशाल ढोरे, सुमित खडसे, पत्रकार गजानन भारती, बालाजी कोंडे, राजू ठाकूर, निलेश बनसोडे, रफिक भाई, गणेश जाधव, सुनील आडे, विजय शिंदे यांच्यासह नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post