वाशिम : नकली बियाणे प्रकरणी कृषी सेवा केंद्रांवर कारवाईची बसपाची मागणी

 


नकली बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाई करा; ॲड. राहुल गवई यांची मागणी


वाशिम | प्रतिनिधी


बहुजन समाज पार्टी (बसपा) वाशिम जिल्ह्याच्या वतीने सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी मालेगाव येथील तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, वाशिम यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यात नकली बियाणे आणि निकृष्ट कृषी औषधांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने संबंधित कृषी सेवा केंद्रे आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.


बसपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल गवई यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची पेरणी बोगस बियाण्यांमुळे वाया गेली असून, दुबार पेरणीची वेळ आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.


प्रमुख मागण्या


- जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांवर अचानक धाडी टाकून बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात यावेत.

- बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचा तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी.

- नकली बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर व संबंधित कंपन्यांवर बियाणे कायदा, १९६६ तसेच BNS कलम 318(4) अंतर्गत फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करावेत.

- फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदानित दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून त्यांना दुबार पेरणी करता येईल.

- मालेगाव येथील वैभव कृषी सेवा केंद्र येथून तणनाशक खरेदी केल्यानंतर शेतकरी कडूजी लक्ष्मण मोरे (रा. कळंबेश्वर) यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्या शेताचा पंचनामा करून शासनाकडून मदत देण्यात यावी तसेच संबंधित कृषी सेवा केंद्रावर कायदेशीर कारवाई करावी.

- तणनाशक फवारणीमुळे नुकसान झालेल्या इतर शेतकऱ्यांच्याही शेतांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नकली बियाण्यांमुळे उगवण कमी होत असून शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येसारखी टोकाची वेळ येत असल्याची चिंता बसपाने व्यक्त केली आहे.


प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने 'हल्लाबोल आंदोलन' करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.


निवेदन सादर करताना बसपाचे जिल्हा प्रभारी ॲड. संघनायक मोरे, रुपेश भगत, वाशिम विधानसभा अध्यक्ष उमेश जाधव, रिसोड विधानसभा अध्यक्ष विनोद अंभोरे, मालेगाव तालुका अध्यक्ष राहुल मैंदकर, वाशिम शहराध्यक्ष अश्विन वाघमारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post