महाराष्ट्र विधानसभेत राजुभाऊ तोडसाम यांची डान्स बारविरोधात ठाम भूमिका; ग्रामीण युवकांचे भविष्य वाचविण्याची मागणी

विधानसभा




मुंबई | सुनिल धुर्वे 


महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान आमदार मा.प्रा. राजुभाऊ तोडसाम यांनी समाजहिताचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा प्रभावीपणे सभागृहात मांडला. राज्यातील डान्स बारच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून, विशेषतः ग्रामीण भागातील युवक आर्थिक, सामाजिक आणि नैतिक संकटात सापडत असल्याची गंभीर बाब त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

सभागृहात बोलताना त्यांनी सांगितले की, डान्स बारच्या आकर्षणामुळे अनेक युवक व्यसनाधीन होत आहेत. त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबांवर, आर्थिक स्थितीवर आणि सामाजिक जीवनावर होत आहे. अनेक कुटुंबांमध्ये वाद, कर्जबाजारीपणा आणि सामाजिक अस्थिरता वाढत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.

राजुभाऊ तोडसाम यांनी राज्य सरकारने डान्स बारवरील नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच ग्रामीण भागातील युवकांना रोजगार, शिक्षण आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळविण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, अशी मागणी केली.

त्यांच्या या भूमिकेचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, समाजहिताचा प्रश्न विधानसभेत ठामपणे मांडल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post