महाराष्ट्र विधानसभेत आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे पुरवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाईची जोरदार मागणी करत हा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
राज्यातील अनेक भागांसह यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे मिळाल्याने उगवण कमी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला.
यावेळी संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कंपन्यांवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचीही ठाम भूमिका त्यांनी मांडली.
भविष्यात निकृष्ट दर्जाचे बियाणे बाजारात येऊ नयेत, यासाठी बियाण्यांच्या गुणवत्ता तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करून शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात यावे, अशीही त्यांनी सरकारकडे मागणी केली.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी सभागृहात बुलंद आवाज उठवत, निकृष्ट दर्जाचे बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी दिला.


